Header Ads Widget

कितीही प्रयत्न केला तरी तुमचे मन अस्वस्थ राहते का? | How To Stop Worrying And Start Living Marathi

 

मनाची अस्वस्थता तुमची झोप उडवत आहे का? जर तुम्हाला मनाला स्वतःच्या काबूत करायचे असेल तर तुम्हाला मनाचा विकास करणे शिकावे लागेल. (10 ways to stop worrying in Marathi?)


मनाचा विकास करूया हे लिहायला, बोलायला खूप सोपं आहे परंतु आचरणात आणायला खूप अवघड आहे.

मानस स्वास्थासाठी खालील दहा गोष्टींचा विचार केल्यावर मनाचा विकास आपोआप होत जाईल...

 

१) तुलना करू नये : (Dont compare yourself with others)

कोणतीही वस्तू, व्यक्ती, प्रसंग अथवा गोष्ट ही एकमेवद्वितीय असते याची दुसर्या व्यक्ती, वस्तू, प्रसंग वा घटनेशी तुलना होऊ शकत नाही. परंतु आपल्याला उंची, रंगरूप, गाडी, घर, स्वभाव इतकच नव्हे तर दुसऱ्याकडे असणाऱ्या प्रत्येक वस्तूशी आपली तुलना करावीशी वाटते.

ही तुलना मनाला सदैव चंचल अवस्थेत ठेवते. प्रत्येक गोष्टीकडे आपण विभागून तोलून मापून मोजूनच पाहू लागतो व त्या गोष्टीतील आनंद, समाधान, सुख नाहीसं होतं. मग लगेच प्रतिक्रिया देऊ लागतं. हे बरोबर,हे चूक, हे चांगलं, हे वाईट.... याकरीता आपण आपली तुलना आधी स्वतःशीच करणं महत्त्वाचं ठरतं. पूर्वी मी असा होतो, मला अमुक अमुक वाईट सवयी होत्या, पूर्वी मी फालतू गोष्टीत वेळ वाया घालवत असे, पूर्वी मी कामचुकार होतो, पूर्वी मी दुसऱ्याची निंदा करीत होतो, पूर्वी मी दुसर्‍यावर आरोप करीत होतो, पूर्वी मला तंबाखू, सिगारेट इत्यादी वाईट व्यसने होती, पूर्वी मी आळशी व बेजबाबदार होतो इत्यादी. 

आता मला विचार करायचा आहे की, वरील पैकी कोणत्या वाईट सवयी यावर्षी, आत्ता, याक्षणी माझ्यातून नाहीशा झाल्या आहेत ? आणि त्याचे उत्तर 'होय', असेल तर तुम्ही निश्चितपणे मनाच्या आरोग्यासाठी काही तरी करीत आहात ! मनाच्या एकाग्रतेसाठी प्राणायाम, ओंकारजप, धारणा, ध्यानाचा अभ्यास अशा वाईट सवयींपासून आपल्याला दूर ठेवतात. तसेच तुलना करायचीच असेल तर थोरामोठ्यांच्या कार्याची करा ! त्यातून प्रेरणा घ्या ! समजुन उमजुन तुलना करा ! प्रेरित व्हा अन्यथा अज्ञानातून केली गेलेली तुलना केवळ दुःख देईल. तुलना करणारा मनुष्य प्राणी सदैव असंतुष्टच राहतो त्याला फक्त स्वतःचं अपयश व दुसऱ्याचं यश दिसतं !

 

२) लालची वृत्ती सोडून द्या ! (Do not be greedy)

    साध्या भाषेत सांगायचं तर आपलं मन खूप हावरट आहे व त्यातच टेलिव्हिजन वरील कार्यक्रम, वर्तमानपत्र मासिकातील जाहिरातींनी आपल्या तोंडाला पाणी सुटतंय. 

मन नेहमीच काहीतरी मागत असते. आणि मग मनाचा समाधान होत नाही. यातुनचं चोरी, लुबाडणे फसवण्याची वृत्ती जन्म घेत आहे. यातूनच जुगार, लॉटरी, रेसकोर्सचं व्यसन लागतं व मनाला हवी ती गोष्ट न मिळाल्याने आलेली निराशा घालवण्यासाठी मन व्यसनांचा, दारू, गुटखा, सिगरेटचा आसरा शोधत आहे. व्यसनांनी निराशा जात नाही, आणिकच वाढते आहे. तेव्हा मोठ व्हायचं असेल तर लोभी, लालची वृत्ती सोडून एक चांगले ध्येय डोळ्यासमोर ठेवून निष्ठेने, प्रामाणिकपणे, सातत्यपूर्वक काम केल्यास यश तुमचंच आहे.कोणत्याही गोष्टीवरचा लोभ तुम्हाला दुःखाकडे नेणार यात शंका नाही. आता पाहा, पैसे आहेत; पण आणखी हवे आहेत, घर, प्लॉट, शेती आहे पण आणखी हवी आहे, बँक बॅलन्स आहे पण तो कमीच वाटतो आहे. इतकच नाही तर मुलांवरचा लोभ, मोह, माया इत्यादींनी सुद्धा निराशा पदरी येते आहे. कारण मी इतक्या खटपटी करून मिळवला आहे हे कसं सांभाळायचं ?  माझ्या पश्चात माझी मुलं हे नीट सांभाळतील ? म्हणजे थोडक्यात काय 'लोभ' म्हणजे चिंता, निराशा, काळजीला आमंत्रण होय! तेव्हा त्यापासून दूर राहण्याकरिता पतंजलि ऋषींनी सांगितलेल्या 'संतोष' या वृत्तीचे पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे! संतोष याचा अर्थ, आहे त्यात समाधानी राहण्याची वृत्ती. एकदा एका माणसाकडं एक भांड होतं. दुसरं काहीही नव्हतं... अंगावर, धड कपडेसुद्धा नव्हते... त्यानं एकदा एका कुत्र्याला नदीत तोंड लावून पाणी पिताना पाहिलं व त्यानं त्याच्याजवळ असणारं भांडं देखील फेकून दिलं... व म्हणाला, "बरं झालं, आता या भांड्याला सांभाळत बसायला नको." ही आहे संतोषी वृत्ती...

10 ways to stop worrying in Marathi?
10 ways to stop worrying in Marathi?


 3) काळजीला धैर्यानं सामोरं जा ! ( Face the worries with courage)

      जगातील, निसर्गातील प्रत्येक गोष्ट सुरक्षित आहे, असा आपला गैरसमज असतो. परंतु एकदा कोणत्याच गोष्टीची शाश्वती नाही, गॅरंटी नाही, हे कळलं की, मग काळजी नाहीशी होते, मन शांत होतं... जीवाची घालमेल थांबते ! काळजी, चिंता करायचं  जणू व्यसनच जडून गेलंय.कारण आपण शरीराकडे एकवेळ लक्ष पुरवतो ! शरीराला अमुक अमुक पदार्थांची, औषधांची ॲलर्जी आहे, या पदार्थांनी, औषधांनी शरीराला त्रास होतो, पुन्हा होईल म्हणून आपण काही निवडक पदार्थ खात नाही. औषधं घेत नाही; पण या शरीराच्या आश्रयाला असणाऱ्या शरीराच्या प्रत्येक सांदीकपारीत ठासून भरलेल्या मनाला कशाची ऍलर्जी आहे, कशाचा त्रास होतोय, हे नको का पहायला? अशा या काळजीला घालवण्यासाठी किंवा काळजी मनात येऊच नये, यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतात.

 उपाय क्र. 1 -  मनाला प्रश्न विचारा पहिला प्रश्न -  काळजी, चिंता आज प्रथमच माझ्या मनात आली आहे का? उत्तर असतं नाही.

 दुसरा प्रश्न -  यापूर्वी काळजी किंवा चिंता माझ्या मनात उत्पन्न झाली तेव्हा मी धैर्याने या काळजीला कसं सामोरं गेलो होतो? उत्तर असतं... त्यातून आपण सुखरूप बाहेर पडलो होतो. मग आता ही काळजी, चिंता देखील अशीच दूर करता येईल. यात काय अवघड आहे? 

 तिसरा प्रश्न - इतकी काळजी, एवढी चिंता मला आहे, असते... पण यातून अगदी वाईटातलं वाईट म्हणजे काय होईल? आणि गमतीचा भाग म्हणजे असा की मन जितका वाईट विचार करतं त्याच्या 10% सुद्धा आपलं काही वाईट होत नसतं. आणि जर काही वाईट झालं तरी आधीच मनात वाईट विचार आल्यामुळे ते वाईट, संकट धैर्यानं स्वीकारायला शिकलं पाहिजे.

 चौथा प्रश्न -  आपण दरवेळा ज्या गोष्टींची काळजी करतो, तेव्हा दरवेळा तसं वाईट घडतं का? नाही.. जेव्हा जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा अँक्सीडेंट होईल अशी काळजी, भीती मनात असते तेव्हा आयुष्यात आजपर्यंत आपण इतकेवेळा स्कूटर, बस, ट्रेन, विमानाने प्रवास केला त्यात किती वेळा आपला अँक्सिडेंट झाला? उत्तर असतं दोन नाहीतर तीनवेळा त्यातून बर्‍याच जणांच्या आयुष्यात सायकल शिकताना पडला व हात मोडला, बाथरूममध्ये पाय घसरून पडला इत्यादी अगदी साधारण इव्हेंटस असतात.

  पाचवा प्रश्न -  आपल्याला जेव्हा मनात काळजी किंवा चिंता उत्पन्न होते तेव्हा त्याची त्याच्या अगदी विरुद्ध किंवा टोकाची भूमिका (म्हणजे आता काहीतरी चांगलं घडणार.) आपण घेतली आहे?  असे उत्तर उत्तर असतानाही मग आता या क्षणापासून ही वृत्ती आपल्या अंगी बाळगून आणि मनात संकल्प करुया, आम्ही निर्भय आहे, मी शक्तिमान आहे, मी सर्वसमर्थ आहे. मला कसली काळजी... कसली चिंता?

   प्रत्येक संकटातून काहीतरी नवीन शिकायला मिळणार असल्यामुळे आनंदात रहा, शांत रहा.. थांबा, गडबडघाई नको. चांगले विचार मनात आणा. प्रत्येक संकट, हरएक वाईट घटना हे आपल्यासाठी सरप्राईज गिफ्ट आहे, हे लक्षात घ्या! 


 4) राग (क्रोध) - ( Anger Management)

     आपल्याला राग येतो, संताप येतो चीड येते हे ठीक आहे; पण तो संताप, राग, चीड, क्रोध का येते? सोप्पं आहे, दुसऱ्यानं केलेल्या चुकीबद्दल आपण चिडतो व त्याच्यापेक्षा कित्येक पटीने स्वतःला शिक्षा करून घेतो, स्वतःला त्रास करून घेतो, राग येतो तो एक क्षण फार महत्त्वाचा असतो. तो क्षणच आपल्या आयुष्याचं नुकसान करतो. मी कुठेतरी वाचलं होतं आपण आपल्या मनाला, शरीराला जसं खाद्य पुरवतो अगदी तसंच मन व शरीर तयार होत जातं. शरीराला चांगला आहार पुरवला, की आरोग्य मिळतं. मनाला चांगले विचार पुरवले, की मन शांत राहतं. जसं उसापासून रस काढताना त्या यंत्राला उसाच्या रसाची चव कळते व नंतर इतरांना. पण तेच त्या यंत्रात दगडधोंडे घातल्यास ते यंत्र मोडतं. त्याचं नुकसान होतं. मग या रागाचे दगड मनाच्या यंत्रात घालायचे की सुखसमाधानाचा ऊस? हे तुम्हीच ठरवा...

(How To Stop Worrying And Start Living Marathi)

  5) अहंकार (मी पणा) - (Selfish attitude)

      आपण पाहिलं की रागातून निराशा, उदासीनता व दुःखाची निर्मिती होते. परंतु मुळात राग निर्माण कशामुळे होतो? तर रागाच्या मुळाशी असते आपली अहंकारी वृत्ती, आपला इगो. त्यामुळे अहंकार जितका मोठा तितका माणूस छोटा होत जातो. मी श्रेष्ठ, बुद्धिमान,निसर्गाला जिंकलेला, अनेकविध शोध लावलेला, सर्वशक्तिमान, सर्वसमर्थ इत्यादी बिरुदं स्वतःच स्वतःला चिकटवून घेणारा माणूस अहंकारानेच लवकर  झिजत जातो. मी, माझे पैसे, माझी नोकरी माझी मुलं, माझं शेत, माझं घर अरे... अरे..... अरे जरा थांबा. संपतच नाहीय लिस्ट ! याकरिता शरीराचा अहंकार सोडून द्यावा लागतो. मी म्हणजेच माझे शरीर, असे म्हणून जगत राहिल्याने अहंकार वाढत जातो व अहंकार हे जड तत्व असल्याने त्याच्यामागून द्वेष हे गुण वाढीस लागून माणूस मायेच्या अधीन होत जातो. 


 6) द्वेष - ( hate)

 साध्या मराठी भाषेत द्वेश म्हणजे जळफळाट. दुसऱ्याचे वाईट होऊ देत ही भावना. कुणाचा मुलगा हुशार, कोणाचं घर चांगलं, कुणाची आलिशान गाडी, कोण श्रीमंत इत्यादी इत्यादी कोणत्याही गोष्टीबद्दल द्वेष मनात उत्पन्न होऊ शकतो. अर्थातच अहंकार व अज्ञानातूनच हा द्वेषमूलक भाव मनात जन्माला येतो. द्वेषाबरोबर येते ईर्ष्या व सुरू होते जीवघेणी स्पर्धा.


 7) न्यूनगंड (Inferiority complex) - 

 स्वतःला कमी  लेखण्यासारखं वाईट काही नाही. दुसऱ्याला चांगल म्हणायला हवं हे खरचं; पण त्याआधी मी चांगला आहे, मी यशस्वी होईन, मी जिंकेन ही वृत्ती वाढीस लागणं तितकंच महत्त्वाचं. या दुर्गुणामुळे मानसिक ताणतणाव, निद्रानाश, भीती, चंचलता इत्यादी मनोविकार बळावतात. याकरीता चांगले दृढ निश्चय व दृढ संकल्प करायला शिकलं पाहिजे. आरशासमोर उभं राहून मीच पूर्णब्रह्म, स्वयंप्रकाशी, बलवान, तेजस्वी तत्त्व आहे. मला कसली भीती इत्यादी संकल्प केले पाहिजेत.


 8)भिती - (Fear)

  या शब्दाची व्याख्या म्हणजे अशा गोष्टींना घाबरणे ज्या गोष्टींना घाबरण्याची गरज नाही. टीचर, कुत्रा, उंच जागा, पाणी, डॉक्टर, परीक्षा, अपयश, अंधार, भविष्य, भूत इत्यादी इत्यादी या लिस्टमध्ये तुम्ही भरपूर भर घालू शकता. घालू नका, पण सांगितलं.

  माणसाला सर्वात जास्त भिती कशाची वाटते ! तर ती मृत्यूची !!  पण होऊन होऊन काय वाईट होणार आहे मृत्यूच ना ! हात्तेच्या!! असं म्हणून बेधडक, बिनधास्त वागल्यास इतर फालतू गोष्टींची भीती वाटेल? नाही ना? मृत्यूपुढे सर्वजण सारखेच! तिथं उच्च नीच, काळा गोरा, गरीब श्रीमंत असा भेदभाव नाही. प्रत्येकजण मृत्यूच्या सावलीत जीवन जगत असतो; पण एकदा केव्हातरी आपण 100% मरणार आहोत, हे कळल्यावर मरेपर्यंत 100% आनंदाने जगायला काय हरकत आहे ? 


  9) व्यसने व वाईट सवयी ताबडतोब सोडा! - (Get rid of addictions and bad habits immediately)

 दारू, सिगरेट, तंबाखू, गुटखा इत्यादी व्यसने व जुगार खेळणे, रेसकोर्सवर जाणे, घरात झोपून राहणे, बेजबाबदारपणे काम करणे, कामचुकारपणा इ. वाईट सवयी ताबडतोब बंद करा. असं म्हणू नका मग ते दुप्पट वेगाने वाढते.


  10) संशय - (Doubt)

 संशय हा गुण सर्वात वाईट. समस्या वृत्तीचे लोक स्वतःवरच विश्‍वास ठेवत नाहीत, तिथे इतरांवर काय ठेवणार? संशयाला मराठीत 'भूत' असं म्हणतात. संशयाचं भूत मानगुटीवर बसले की, निघत नाही असं म्हणतात हे खरच आहे. संशयातून ढोंग, लबाडी, कपटी वृत्ती जन्माला येते. त्यामुळे संशयी वृत्तीला वेळीच आळा घालणं महत्त्वाचं असतं.