Header Ads Widget

रागावर नियंत्रणासाठी काही टिप्स | How To Control Anger Marathi

 राग(क्रोध)

     आपल्याला राग येतो, संताप येतो चीड येते हे ठीक आहे; पण तो संताप, चीड, राग का येते? सोपं आहे, दुसऱ्याने केलेल्या चुकीबद्दल आपण चिडतो व त्याच्यापेक्षा कित्येक पटीने स्वतःला शिक्षा करून घेतो, त्रास करून घेतो, राग येतो तो एक क्षण फार महत्त्वाचा असतो. तो क्षणच आपल्या आयुष्याचं नुकसान करतो. 

मी कुठेतरी वाचलं होतं आपण आपल्या मनाला,शरीराला जंस खाद्य पुरवतो अगदी तसेच मन व शरीर तयार होत जातं. शरीराला चांगला आहार पुरवला, की आरोग्य मिळते. मनाला चांगले विचार पुरवले, की मन शांत राहते. जसं उसापासून रस काढताना त्या यंत्राला आधी उसाच्या रसाची चव कळते व नंतर इतरांना. 

पण तेच त्या यंत्रात दगडधोंडे घातल्यास ते यंत्र मोडतं. त्याचं नुकसान होतं. मग या रागाचे दगड मनाच्या यंत्रात घालायचे की सुखसमाधानाचा ऊस? हे तुम्हीच ठरवा...

     आता नेहमी आपण बोली भाषेत म्हणतो मला राग आला. अरे, राग येतो कसा? तो तुझ्यात आधीपासूनच आहे. तो फक्त व्यक्त झाल्यावर कळतं इतकंच. ज्याप्रमाणे गळ्याला मासा का लागतो? 

कारण तो आधीपासून पाण्यात आहे म्हणूनच. होय ना? त्याप्रमाणे राग,संताप, चीड ही भुतावळं आधीपासूनच मनात आहेत व गंमत म्हणजे त्यावरचा उपायही (रागाला शांत करायचा) मनालाच करायचा आहे. असा व्यायाम, अशी कवायत, मनाकडून करून घ्यायला हवी!

      आता राग क्षणार्धात् शांत करायचे काही सोपे उपाय आपण पाहूया. यातले बरेचसे आपल्याला माहित आहेतच!

  1) उलटे अंक मोजणे - राग आल्यावर तात्काळ डोळे बंद करून शरीराची हालचाल न करता (ध्यानात्मक पद्मासन किंवा वज्रासनादि आसनात बसल्यास फारच उत्तम!) 10  पासून उलट 1 पर्यंत जलद गतीने अंक मोजत यावे. 999,888,777,666,555,444,333,222,111 असे नेल्सन उलट म्हणत यावेत. 

30 पासून उलट  3 पर्यंत फक्त 3 ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे थोडक्यात तीनाचा पाढा उलट म्हणत यावा! अन् काय आश्चर्य! तुमचा राग तोवर शांत झालेला असेल! खरं सांगतो, तो क्षण महत्त्वाचा! राग आल्यावर आणखी एक गोष्ट करता येईल व ती म्हणजे मनात ईश्वराचा धावा करणे, मंत्र म्हणणे, स्तोत्र म्हणणे.

  2) शवासन -  राग येण्याचं प्रमुख कारण आहे मनावर आलेला ताण. हा ताण हातवारे करून, डोळे वटारून, तोंडातून अपशब्द उच्चारून फक्त व्यक्त केला जातो इतकंच याचा सरळ अर्थ आहे आधी आपण मनाला शांत केलं पाहिजे म्हणजे पर्यायानं शरीर आपोआप शांत होत जाईल. 

याकरिता पटकन एक सतरंजी अंथरून या सतरंगी मनाला शांत करूया. सतरंजीवर दोन पायात अंतर घेऊन, दोन हात शहरापासून बाजूला करून स्वतःच स्वतःला सूचना देत पायाच्या अंगठ्यापासून ते वर डोक्यापर्यंत हळूहळू क्रमाक्रमाने शरीर शिथिल करीत वर वर यावे! हे करताना श्वासाची गती जाणीवपूर्वक कमी करावी लागते यासाठी पोट जास्त हलवून चालत नाही. पोटाची हालचाल जितकी संथ,  तितका श्वास हळू चालतो, नाडीचे ठोके संथ पडतात, ब्लडप्रेशर कमी कमी होऊन राग शांत होत जातो.

 अर्थात केवळ राग आल्यावरच नव्हे तर द्वेषभावना मनात आल्यावर, अहंकार दुखावला गेल्यावर, भिती वाटल्यावर, लालची भाव मनात आल्यावर, गोंधळाची अवस्था मनात उत्पन्न झाल्यावर, निराशा, उदासपणा आल्यावर नाडीचे ठोके अनियमित होत असतात व योगशास्त्रातील शवासनासारख्या सोप्या उपायाने हे ठोके नियमित होऊन, ब्लडप्रेशर नियंत्रित होऊन मनाला उत्साह, तरतरी येते, बरे वाटते, हे तितकेच खरे!

How To Control Anger Marathi
How To Control Anger Marathi


  3) थंड पाणी प्या -  राग आला रे आला की पटकन् थंड पाण्याची बाटली तोंडाला लावा. (माणसं याच्या उलट दुसरी कुठली तरी बाटली तोंडाला लावतात हे काय सांगायला हवं?) रागाने लालबुंद झाल्यावर शरीरातील रक्ताभिसरणाचा वेग कमालीचा वाढलेला असतो.

 नाडीचे, हृदयाचे ठोके वाढलेले असतात, मुठी आवळल्या जातात, डोळे लालबुंद होतात, हात पाय कापायला कापायला लागतात व थंड पाणी प्यायल्याने ही शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होऊन राग निवळतो.

  4) हळू बोलण्याची सवय करून घ्या किंवा मौन धारण करा! -  आपण नेहमी पाहतो. राग आला की, माणूस मोठमोठ्याने, तावातावाने हातवारे करीत बोलतो व मोठ्याने, ओरडून बोलले की राग आणिकच वाढतो. 

म्हणून राग आल्यावर प्रयत्नपूर्वक हळूवार बोलावे  किंवा समोरचा जास्त संतापला तर तुम्ही  React होऊ नका. मौन व्रत धारण करा! म्हणजे समोरच्या व्यक्तीचा आवाज हळूहळू कमी होत जाईल.

  5) आजचा राग लांबणीवर टाका -  व्यवहारात बऱ्याचदा आपण आजची कामं उद्या करू असं म्हणतो तसं राग आला की ताबडतोब मनाला सांगा हा राग उद्या करू आता नको. 

समोरच्या व्यक्तीने कितीही शिव्यांची लाखोली वाहिली तरी आधी सांगितलेला मौनाचा प्रकार  अंमलात आणा व मनात म्हणा आपण उद्या हा राग अमुक अमुक व्यक्तीवर काढू. गंमत म्हणजे या उपायाने समोरची व्यक्ती देखील थंड होईल! 

  6) अनिष्ट परिणामांचा विचार करा! -  राग आल्यावर लगेच विचार करा. माझ्या रागाने, संतापाने काय होणार आहे? कोणाला त्रास होणार आहे? 'अतिराग आणि भीक माग', असं जुने लोक म्हणतात म्हणजे रागाने निश्चितच काहीतरी वाईट घडू शकतं. म्हणून मी शांत बसतो ही धारणा ठेवा.

  7) आरशात पहा! - राग आला की, लगेच आरशात पहा आणि काय आश्चर्य! तुमचा राग पळून जाईल आणि का? म्हणून विचारलं नाहीत? अहो, तुमचा चेहरा आरशात इतका क्रूर आणि भयानक दिसेल की, तुम्हीच मनात म्हणाल,"मी असा विचित्र नको रे बाबा दिसायला!" आणि परत तुम्ही रागवायचं कमी कराल.

  8) जागरूक असणे, समजून घेणे -  जेव्हा आपण प्रत्येक क्षण जागृत अवस्थेत असतो तेव्हा आपले लक्ष सर्व ठिकाणी सारखं असतं. जागृतावस्थेत राहिल्याने अनेक नकारात्मक, वाईट घटनांचा प्रभाव आपल्या मनावर, शरीरावर होत नाही कारण आपल्या लक्षात येईल कित्येक वेळा राग शांत झाल्यावर आपल्याला वाटतं 'अरे, किती क्षुल्लक गोष्टीसाठी आपण चिडलो. 

एवढी चिडचिड करायची खरच गरज नव्हती.' परंतु रागाच्या स्थितीत मन  चांगला विचार करायची शक्ती हरवून बसतं व वारंवार तीच तीच चूक हातून घडत जाते.जागरूक रागण्याचा अभ्यास आपण वाढवल्यास आपल्या सहज लक्षात येईल की, राग आपल्या मनात पिंगा घालतो आहे, धिंगाणा घालतो आहे, येतो आहे, जातो आहे, समोर आहे, शांत झाला आहे, याच्याही पुढे जाऊन समजून उमजून रागवूया, असं मनात म्हणायला सुरुवात करा. 

(रागावर नियंत्रणासाठी काही टिप्स | How To Control Anger Marathi)

उदाहरण द्यायचं झालं तर संत एकनाथ नदीतून आंघोळ करून बाहेर आल्यावर एक माणूस त्यांच्या अंगावर थुंकला तेव्हा त्याच्यावर न ओरडता पुन्हा एकनाथांनी चंद्रभागेत स्नान केलं, बाहेर आल्यावर तो मनुष्य पुन्हा त्यांच्या अंगावर थुंकला. असं सात ते आठ वेळा झाल्यावर मात्र थुंकणारा शरमला, ओशाळला व त्याने एकनाथांचे पाय धरले. तेव्हा महाराज म्हणाले, "बरं झालं, तुझ्यामुळे चंद्रभागेत सलग इतक्यांदा अंघोळ करण्याचे पुण्य पदरी पडलं!"

 अशा रीतीने कुंभार ज्याप्रमाणे मडकं भाजून झाल्यावर त्याला चारी बाजूंनी मारून, ठोकून बघतो. कुठं कच्च तर राहिलं नाही ना ? त्याचप्रमाणे एकनाथ महाराजांनी दुसऱ्याचा राग स्वतःच्या अंगावर झेलला व समोरच्या गृहस्थाचा राग शांत केला!  आहे की नाही मजा? याला म्हणतात समजून,उमजून रागावर नियंत्रण ठेवणं, त्याला थोपटून, गोंजारून शांत करणं.

  9) रागावर हसा! आनंदी राहा! -  सतत राग, संताप, चिडचिड ही मनोदौर्बल्याची लक्षणे आहेत. यामुळे निराशा, उदासीनता, वैफल्य येऊ शकतं म्हणून आपण काय करूया  रागावर हसायला सुरुवात करुया, आनंद व्यक्त करूया. विनोदी पुस्तक वाचूया. विनोदी मित्रांशी गप्पा मारूया. 

दिवसातून तीन ते चार वेळा पोटाला खायला लागतं तसं म्हणाला हसायचं खाद्य पुरवून मानसिक विकारात मुक्ती मिळवूया. हसायची सुरुवात पहाटे उठल्यापासून करूया, म्हणजे अखंड दिवस चांगला जाईल.  मनापासून हसूया. हे आनंदतरंग आतून, अंतरंगातून येउ देत. ज्याप्रमाणे दगड मारला म्हणून झाड फळ द्यायचं थांबवत नाही, आगीचे लोळ आकाशात गेले म्हणून वरून आग बरसत नाही, पाण्याचाच वर्षाव होतो.

 त्याप्रमाणे आनंदी माणसांच्या बोलण्यातून, वागण्यातून आनंदच प्रकटतो. ते सदैव आनंदच वाटत फिरतात. कारण आनंदातून ऊर्जा मिळते, उत्साह संचारतो, तुम्ही आनंदी राहिलात की, समोरची माणसंही तुम्हाला आनंद देऊ लागतात. शेवटी हे  Give & take सारखं असतं.हो ना?

  10) साक्षीभावाने रागाकडे पहा! -  राग आला की आधी मनात विचार करा की राग नेमका कोणाला आला आहे? तुम्हाला, तुमच्या शरीराला की तुमच्या मनाला? मनाला आला असेल असं समजून एक प्रयोग करूया. आपण एखाद्या तळ्याच्या काठी उभं राहूया. पाण्यात आपलं प्रतिबिंब पडलं आहे, आपण एक खडा घेतला व पाण्यात टाकला तर काय होतं? ते प्रतिबिंब हलू लागतं, ते काहीवेळा नाहीसं होतं किंवा त्याचा चोळामोळा होतो तेव्हा तुमच्या मनात काय विचार येतो?

 माझ प्रतिबिंब हालतयं, मी नाही, माझ्या प्रतिबिंबाला त्रास होतोय. मला काहीच फरक पडत नाही. त्याचप्रमाणे तुमचा राग तुमच्या मनाला आहे. तुमच्या शरीराला नाही, तुम्हाला नाही असं म्हणा! आता समजूया राग तुमच्या शरीराला आला आहे. आता विचार करूया. जेव्हा आपण माईकवरून बोलतो तेव्हा आपले विचार सर्वत्र पोहोचतात म्हणजे आपल शरीर माईक झालेलं असतं का?

 आपण गाडीतून दुसऱ्या ठिकाणी जातो, गाडी शरीराला दुसरीकडे नेते म्हणजे शरीर गाडी होतं का? ह्याप्रमाणे असा विचार करूया की, शरीर आपण वापरत आहोत. आपण या देहाचे नोकर आहोत. नोकर शब्द झोंबत असेल तर (वरील पुराण वाचून झोंबणार नाही अशी आशा आहे) ट्रस्टी म्हणा हवं तर... 

आपण या शरीराचे ट्रस्टी आहोत. या शरीराचं सांभाळ करणं, त्याला त्रास होऊ न देणं हे आपलं कर्तव्य आहे, असं समजून वागल्यास शरीर व मनाला रागाचा त्रास होत नाही. कारण आपण त्या रागापासून कोणीतरी वेगळे, सर्वसमर्थ, स्वयंप्रकाशित तत्त्व आहोत.  आपण मूलत: शांत, आनंदीच आहोत. फक्त हे सर्व आपण विसरून गेलो आहोत. राग शांत करण्याचे उपाय आपल्यातच आहेत की जे आपण बाहेर शोधण्यात मग्न आहेत. 

   अशा रीतीने राग शांत करायचे दहा उपाय वर्णिले आहेत. राग हा एक रोग असेल तर वरील दहा उपाय ही त्यावरील औषधे आहेत. आता तुम्ही स्वतःच डॉक्टर होऊन विचार करा की, त्यातील कोणतं प्रिस्क्रिशन तुम्हाला लागू पडतं ते! तेव्हा आजपासून माझ्या नाकावर राग आहे. असं बोलू नका.