Header Ads Widget

ध्यान करण्याचे फायदे (Benefits of Meditation in Marathi)


     



आज ध्यान जमले नाही, मूड नव्हता इत्यादी सारखी वाक्य ऐकल्यावर 'ध्यान' ही कृती आहे असा लोकांचा गैरसमज असल्याचे दिसून येते. परंतु प्रत्यक्षात 'ध्यान' ही कृती नसून ती मनाची अवस्था आहे. 

आपल्या श्वास आणि उच्छवासाइतकीच ती  सहज व नैसर्गिक अशी गोष्ट आहे. परंतु आपला श्वासउच्छवासही नकळतपणे होत नसतो कारण ध्यानात श्वासोच्छवासाची जाणीव सदैव ठेवावी लागते. निदान सुरुवातीला तरी ध्यानात श्वासउच्छवासाला महत्त्व असतं...

     मेंदूतज्ञ 'ध्यान' हे मेंदूचेच कार्य आहे असे समजतात. ध्यानाच्या नियमित सरावाने मेंदूतील Prefrontal Cortex  हा भाग सक्रिय होत जातो. इतर प्राणीमात्रात हा भाग विकसित झालेला दिसून येत नाही याचे कारण इतर प्राण्यांना आत्मभान नसते... 

आत्मभान हे मानवाला मिळालेले वरदान आहे... या आत्मभानाच्या जाणिवेमुळेच माणूस स्वतःचे ध्येय ठरवून नियोजन करू शकतो, भविष्यासाठीची तरतूद करतो. फक्त मतिमंद किंवा मनोविकृतींनी पछाडलेल्या लोकांना ध्यान करता येत नाही.

      'ध्यान' हा सरावाचा भाग आहे. हळूहळू तो इतका आत्मसात होतो की सहज सायकलवरून फेरफटका मारून यावा किंवा आंघोळ करावी इतके ते अंगवळणी म्हणण्यापेक्षा मनवळणी पडते. नंतर नंतर मेंदू हे काम स्वतः न करता मज्जारज्जूकडे सोपवतो याचा अर्थ ध्यान आता आपोआप होऊ लागते. 

जसे शिलाईकाम, सायकलींग, ड्रायव्हिंग करताना आपले लक्ष त्या क्रियांमध्ये असतेच असे नाही; पण कृती मात्र घडत असते.

     ध्यान हे मनाला भूत व भविष्याच्या कचाट्यातून सोडवून वर्तमानात जगायला शिकवते !  श्वासाकडे लक्ष देत नाकपुड्यांच्या मुळाशी आज जाणारा थंड स्पर्श व उच्छवासावाटे बाहेर पडणारा गरम स्पर्श यांचा अनुभव घेत मेंदूला त्यात सहभागी करून घेणे ही ध्यानाची पहिली पायरी !  

परंतु हे करताना ध्यान म्हणजे श्वासोच्छ्वासावर मन एकाग्र केलं की झालं असा गैरसमज होण्याची शक्यता आहे. ध्यान म्हणजे केवळ एकाग्रता नव्हे ! ध्यान म्हणजे आत्मभान ! म्हणजे मनाकडे साक्षीभावने, तटस्थपणे, ञयस्थपणे पाहणे. म्हणूनच ध्यान ही कृती नसून मनाची एक अवस्था आहे...

      हे ध्यान करताना सावध, जागरूक असणे म्हणजे 'सजग ध्यान'. मनाची एकाग्रता होत नाही म्हणून निराश न होता पुन:पुन्हा श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा सराव म्हणजे 'समतोल'... हा सावधपणा व समतोल साधला गेला की ध्यान जमायला लागतं...

Importance of Meditation in Marathi

Benefits of Meditation in Marathi

      कोणतीही संवेदना किंवा भावना यांना प्रतिक्रिया दिली की आपल्याला राग येतो, चिडचिड होते, अस्वस्थता वाढून निराशा येते... 

असे वारंवार घडल्याने त्याचे रुपांतर मनोविकारात होत जाते. काहीवेळा नकारात्मक विचार कमी असतात परंतु त्यांची तीव्रता जास्त असू शकते. जेवढी प्रतिक्रिया तीव्र तेवढा मेंदूतील Amygdala नावाचा भाग उत्तेजीत होतो व विचारांना वेळच मिळत नाही आणि रागाच्या भावनेच्या आहारी जाऊन चुका होतात, गुन्हे घडतात...

 नकारात्मक विचारांचं पर्यवसान निराशेत... निराशेतून आत्महत्या, खून इत्यादी गोष्टी घडू लागतात. सजग किंवा सावध व जागरूक ध्यानाने या भावना बदलण्याची सवय मेंदूला जडते... 

क्रियेला प्रतिक्रिया  देण्याची खोड मोडते... त्यामुळे भावनिक बुद्धीचा विकास होऊन राग, द्वेष, चिंता, निराशा इत्यादी वाईट भावनांची तीव्रता आणि कालावधी कमी कमी होत जातो...

       अशा प्रकारे भावनिक बुद्धीचा विकास झाल्याने स्वत:बरोबरच दुसऱ्या व्यक्तींच्या भावना ओळखता येऊ लागतात. डॉक्टर डॅनियल गोलमन यांचे 'इमोशनल इंटेलिजन्स' नावाचे पुस्तक ह्याच गोष्टी अधोरेखित करते. या भावना माणसाच्या चेहऱ्यावरून, डोळ्यांतून ओळखता येतात. 

या भावनांची तीव्रता मेंदूतील Amygdala नावाचा भाग उत्तेजित होण्यावर अवलंबून असते आणि गंमत म्हणजे Amygdala हा भाग उत्तेजित  झाला की मेंदूतील Prefrontal Cortex  हा माणसाला आनंदी ठेवणारा भाग देखील उत्तेजित होऊ लागतो... 

परंतु सावध किंवा सजग ध्यानाच्या अभ्यासाने केवळ Prefrontal Cortex हाच भाग उत्तेजीत होतो. Amygdala उत्तेजित होत नाही असे दिसून येते, ह्याचा अर्थ सावध, जागरूक ध्यानाने भावनांवर नियंत्रण ठेवण्याची कला जमू लागते...

       ध्यानाचे असंख्य पद्धती प्रचलित असल्या तरी खालील ध्यानाच्या पद्धती नेहमी वापरल्या जातात...

  1) ज्योती ध्यान 

  2) सजग ध्यान 

  3) कल्पना ध्यान 

  4) करूनाध्यान

   ध्यान कोणत्याही प्रकारे करा; पण सर्वात महत्वाचे म्हणजे स्वत्वाची जाणीव किंवा आत्मभान हा ध्यानाचा पाया आहे...

    रागाच्या, भावनेच्या भरात मी बोलून गेलो असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा भावनिक मेंदूने वैचारिक मेंदूचा ताबा घेतलेला असतो... ध्यानाच्या अभ्यासाने वैचारिक मेंदू अधिक सक्रिय होतो. तो भावनेच्या आहारी जात नाही व विघातक, विखारी, विनाशक, विध्वंसक विचारांची, भावनांची तीव्रता कमी कमी होत जाते...

     ध्यानामुळे क्रियेला प्रतिक्रिया मनात उत्पन्न झाल्यावर तिची तीव्रता कमी करता येते किंवा त्याऐवजी दुसरी प्रतिक्रिया तिथे अंतरंगात उत्पन्न करता येऊ लागते. एखादी भूतकाळात घडलेली घटना जशीच्या तशी आठवतो. वारंवार त्या घटनांची उजळणी करतो आणि राग किंवा निराशेचं, तणावाचं भूत मनगुटीवर बसतं...

 तसेच भविष्यात एखादा भीतीदायक प्रसंग घडणार, संकट येणार अशी कल्पना आपण करतो व तणाव वाढू लागतो, पण ह्या ध्यानरूपी जादूच्या छडीचा योग्य वापर करून शरीर व मन शांत व सुस्थितीत ठेवता येऊ लागतं...

     ध्यानाच्या नियमित सरावाने आकलनशक्ती, स्मरणशक्ती, सहनशक्ती, निर्णयक्षमता वाढते, प्रतिकारशक्ती वाढते, कार्यक्षमता वाढते, व्यक्तिमत्वाचा विकास होतो, झोप शांत लागते...

 हे सर्व ध्यानाचे फायदे लक्षात घेऊनच अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅली मध्ये असणाऱ्या जवळपास सर्व कॉर्पोरेट कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांसाठी ध्यानवर्ग सुरू केले आहेत... जनरल मोटर्स, ग्लँक्सो स्मिथक्लिन अँपल कम्प्युटर्स,ल्युसेंट इंटरनॅशनल कंपन्यांनी आपल्या प्रशिक्षण शिबिरात ध्यानाचा समावेश केला आहे...

ध्यान करण्याचे फायदे (Benefits of Meditation in Marathi)


 काही कंपन्या काम सुरू करण्यापूर्वी दहा मिनिटे तर काही कंपन्या केवळ ध्यानासाठी मधे दहा मिनिटांची सुट्टी देतात... अशा प्रकारच्या सामुदायिक ध्यानामुळे कर्मचाऱ्यांच्या मनातील निराशा कमी होऊन ते नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण घटले आहे, कंपनीचे हित पाहण्याची वृत्ती वाढीस लागली आहे, त्यांच्यातील काळजी, चिंता करण्याचे प्रमाण घटले आहे...

 त्यांना असणारे पाठदुखी, डोकेदुखी इत्यादी सारखे शारीरिक त्रास तर कमी झाले आहेतच, शिवाय त्यांचा तणावही नाहीसा झालाय...

      गुगल सारख्या मोठ्या कंपनीत 'इनसाईड सर्च' (अंतर्विश्वाचा शोध) हा कार्यक्रम खास कर्मचाऱ्यांसाठी राबवला जातो...अतिशय व्यस्त असणार्‍या कर्मचाऱ्यांना मधेच थांबून थोडे मन शांत करण्यासाठी ही दोन ते तीन मिनिटे एका जागी बसण्याची सवय लावून त्यातून सजग किंवा सावधध्यानाचा पाठ दिला जातो. मधे मधे थांबून 2-2 मिनिटे असे करीत दिवसाकाठी दहा ते वीस मिनिटांचे ध्यान होऊ लागते.

     हल्ली कामाचा ताण असणारे कर्मचारी ताणातून बाहेर पडण्यासाठी तंबाकू, सिगरेट, दारू इत्यादी व्यसनांच्या आहारी जाताना दिसताहेत... पण त्याऐवजी मन शांत करणारं हे 'ध्यान' केलं तर... 

मनाची शक्ती वाढून मेंदू पुन्हा नव्या ऊर्जेने, उत्साहाने कामाला लागतो, व्यसने टाळली जातात, पैसा वाचतो, व्यसनांमुळे होणारे शारीरिक व्याधी ठळतात.. त्यामुळेच तासन् तास एकाच ठिकाणी बसून नोकरी करणाऱ्या बँका, शेअर मार्केट, फंड कंपन्या, कॉर्पोरेट फर्म्स मधे हल्ली भावातीत ध्यानचे प्रशिक्षण दिले जाते...

 वरील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी तुमचा एक चुकीचा निर्णय लाखोकरोंडोंचं नुकसान करू शकतो... आणि अर्थातच ध्यानाचा अभ्यास तुम्हाला सावध, उत्साही बनवतो... तुम्ही अधिकाधिक डोळसपणे व्यवहार व विचार करू लागता... अंधपणे क्रियेला प्रतिक्रिया दिली जात नाही...

    ध्यानाच्या समतोल सावध व जागरूक अभ्यासाने संघभावना तर वाढतेच शिवाय स्वतःचे गुणदोष कळतात, अहंकार कमी होऊन नम्रता वाढीस लागते. त्यामुळेच तर फोर्डमोटर, फेसबुक, ॲपल कम्प्यूटर, गुगल सारख्या जगप्रसिद्ध नामवंत कंपन्यांनी आपल्या कंपनीत ध्यानासाठी स्वतंत्र कक्ष तयार केलेत. ट्विटरचा जनक इवान विल्यम्सने तर आपल्या कंपनीत कर्मचाऱ्यांना नियमित ध्यान करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे...

     थोडक्यात काय दिवसभराचा ताण, गोंधळ, अनेकविध प्रकारचे विचार व माहिती, रहदारी, गोंगाट इत्यादी पासून दूर जाऊन मन शांत करण्याचा ध्यानाइतका सोपा उपाय कोणताही नाही. वेळेचे व्यवस्थापन करणे व आपले कौशल्य वाढविण्यासाठी आधुनिक युगात प्रत्येकाने ध्यान केलेच पाहिजे !